जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. किनारपट्टी भागात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील गर्दीच्या किनाऱ्यांवर चोवीस तास गस्त ठेवली जात आहे. तसेच पर्यटन स्थळांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. किनारपट्टी भागातील लँडिंग पॉईंट्सवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३६ लँडिंग पॉईंट्स आहेत. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. तसेच देशभरातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून योग्य ती पावले उचलली जात आहेत.
Leave a Reply