”अमित शहांना बाळासाहेबांनी तर मोदींना पवारांनी वाचवलं”; संजय राऊतांचा पुस्तकातून महागौप्यस्फोट

मुंबई : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

मोदींना अटक होऊ नये म्हणून पवारांनी केली होती मदत?

संजय राऊत यांच्या या पुस्तकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाप्रकारे मदत केली याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर गुजरात दंगल प्रकरणात वाचवण्यासाठी शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरंद्र मोदी यांना कशा पद्धतीने मदत केली, याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली. तसेच अमित शहा यांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवारांनी कशी सूत्रेहलवली याबाबत देखील या पुस्तकात संजय राऊत यांनी लिहिले आहे.

पुस्तकातील नेमका तो किस्सा काय?

पुस्तकातील त्या प्रकरणात लिहलय की, अमित शहा यांच्या मागे सीबीआय तपासाचा ससेमिरा लागल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेच मदत करू शकतात, असे कोणीतरी सुचवले होते. त्यामुळे लहान असलेल्या जय शहाला घेऊन अमित शहा हे मुंबईत पोहोचले होते. मात्र कलानगरच्या मुख्य गेटवरच शहा यांना अडवून ठेवण्यात आले होते. बन्याच काळ प्रतीक्षा करूनही ठाकरे यांची भेट होत नसल्याने अमित शहा हे घामाघूम झाले होते. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे, मात्र त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी देखील शहा मातोश्रीवर पोहोचले मात्र शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण भोगत आहोत, अशी दर्दभरी कहानी अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन केला. त्यानंतर अमित शहा यांची सुटका झाली असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *