अन् कुणाल कामराने मागितली माफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त पॅरोडी केल्यानंतर कुणाल कामरा याला शिवसैनिकांचा रोष सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस देखील कुणालच्या मागावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणालने माफी मागावी, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याला समन्स पाठवले आहे. या वादानंतर कुणालच्या शोची तोडफोड करण्यात आली असून, शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एका प्रेक्षकाला अनावश्यक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारसमोर माफी मागण्यास नकार देणाऱ्या कुणाल कामराने मात्र शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकाची माफी मागितली आहे

नेमकं काय घडलं?

कुणाल कामराच्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना पोलिसांकडून नोटिसा येऊ लागल्या आहेत. त्यांना मानहानीच्या खटल्यात साक्षीदार म्हणून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले जात आहे. याच नोटीसचा फटका खारघरमधील एका बँकिंग व्यावसायिकाला बसला. हा व्यक्ती तामिळनाडू आणि केरळमध्ये फिरायला गेला होता. मात्र, पोलिसांच्या दबावामुळे त्याला सहलीतून वेळेआधीच परतावे लागले. या प्रकरणात ‘नया भारत’ या विशेष कार्यक्रमावरून कुणाल कामराविरोधात 3 गुन्हे दाखल झाले आहेत. 17 दिवसांच्या सहलीवर असलेल्या त्या व्यक्तीला 6 एप्रिल रोजी परतायचे होते, पण 28 मार्चलाच पोलिसांकडून त्याला फोन आला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस आली आणि 30 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले.

मी 21 मार्चला मुंबईहून सहलीसाठी निघालो होतो आणि 6 एप्रिलला परतणार होतो. पण तामिळनाडूमध्ये असताना पोलिसांचे वारंवार फोन येऊ लागले. अधिकाऱ्याने माझ्या शहराबाहेरील स्थितीबद्दल शंका घेतली आणि खारघरच्या घरी येण्याची धमकी दिली;त्यामुळे मी माझी ट्रीप मध्येच थांबवून परत आलो, असे या बँकरने सांगितले.

याशिवाय, मी फक्त शोसाठी ऑनलाइन तिकीट बुक केले होते आणि त्याचा पुरावा पोलिसांना दिला. पण तरीही ते म्हणतात, मी कुणालच्या शोचा व्हिडिओ एडिट केला; कुणाल मला त्याचा व्हिडिओ एडिटसाठी देईल का? असा संतप्त सवालही या प्रेक्षकाने केला. दुसरीकडे, प्रेक्षकांना अशा कोणत्याही नोटिसा पाठवलेल्या नाहीत, असा दावा मुंबई पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत केला आहे.

कुणाल कामरा वाद नेमका काय?

24 मार्चला कुणाल कामराने ‘नया भारत’ हा स्पेशल शो यूट्यूबवर अपलोड केला. त्यातील एका गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले गेले. या शोमुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आणि त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली. त्यानंतर कुणाल कामरावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाने कुणालला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. पण पोलिसांनी शोचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेरामन आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *