आणि धुमसते ठाणे पेटलेच…! – महेश म्हात्रे

•

एकनाथ भाई शिंदे ‘साहेब’ झाल्यापासून ठाण्यातील प्रत्येक नेत्याला शिंदेसारखा ‘भाई’ होण्याची आणि मुंबईशेजारच्या ठाण्याला, महानगरी मुंबई होण्याची ‘घाई’ झाल्याचे दिसते … त्यामुळे तलावांचे शहर असलेले, ऐतिहासिक श्री स्थानक ठाणे, वेगाने जागा,जमिनीं, फुगवलेली कंत्राटे आणि राजकीय डिलिंगच्या ‘गुप्त खजिन्या’चे केंद्र बनले… आणि दिल्लीच्या किल्लीने राज्यातील सत्ताकेंद्र होण्याची स्वप्नं पाहू लागले…
गेल्या दोन दशकात ठाण्याचा चेहरामोहरा बदलला होता. पण चार वर्षांपूर्वी ठाण्याला पहिला महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाभला आणि मग या बदलांना अफाट वेग आला. भले मोठे प्रोजेक्ट्स , त्यांचे बडे, बडे आकडे, प्रचंड बांधकामे, अफाट आर्थिक उलाढाल आणि वाढती गुन्हेगारी यामुळे सालस ठाणे गजबजून गेले… माजून, सुजून गेले…
एकेकाळी कवीवर्य पी सावळाराम, पंडित राम मराठे, अशोक चिटणीस यांचे सांस्कृतिक शहर म्हणुन ओळखले जाणारे ठाणे, पुढे भाई, बंटी, शेठ, सुधा, असे लीडर , बदमाश बिल्डर आणि त्यांचे पंटर, चिटर, शार्पशुटर यांचे आगर बनले… ते कायमचे !
त्यामुळे झाले काय तर, ठाण्याच्या सर्व क्षेत्रात अनागोंदी माजली… परिणामी कोणालाही महत्त्व आले. ‘आंदु’पांदु गुंडांची ‘भाई’गिरी फोफावली… ‘शिंदे’शाहिच्या आश्रयाला आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आकडे फुगवण्याचे अगणित रेकॉर्ड केले आणि मोडले… या सगळ्याचा कहर म्हणजे, ठाण्यातील रंगीबेरंगी थापा देखील स्वतःला ‘गगनभेदी’ म्हणवून घेताना दिसू लागल्या…
एकूणच, ठाण्याचे जुने वैभव हरवले.
म्हणूनच, या बदलत्या ठाण्यात,
उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची कार्यालयात घुसून हत्या होणे, ही केवळ राज्यातील आणखी एक गुन्हेगारी घटना नाही. तर हा एका शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाचा मन अस्वस्थ करणारा टप्पा आहे…
२९ सप्टेंबरच्या रात्री पूर्णेकर यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात, गोळीबाराबरोबर धारदार शस्त्राचाही वापर झाल्याचे वृत्त आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हल्ल्यापूर्वी रेकी झाल्याचे आणि आरोपी नियोजनपूर्वक घटनास्थळी आल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली असून काही संशयितांना ताब्यात घेऊन अन्य आरोपींचा शोध सुरू आहे… त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव येणे, ही बाब गंभीर आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या हत्येमागील कारणांविषयी सुरू झालेली चर्चा. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादाचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मुलानेही हल्ल्यापूर्वी रेकी झाल्याचा आरोप केला आहे. अर्थात, यातील कोणताही राजकीय अथवा आर्थिक संबंध अद्याप पोलिस तपासातून सिद्ध झालेला नाही. म्हणूनच कोणावरही आधीच ठपका ठेवणे योग्य ठरणार नाही. पण एवढे मात्र स्पष्ट आहे की, हा हल्ला अचानक उद्भवलेल्या भांडणातून झालेला नाही… ही अगदी नियोजनपूर्वक, थंड डोक्याने केलेली हत्या आहे. म्हणून तिचा, तिच्यामागे असणार्‍या मास्टर माइंडचा शोध लागला पाहिजे.
त्याचसोबत, आज या खुनाने मुंबईशी स्पर्धा करणार्‍या ठाण्यापुढे जे प्रश्न उभे केले आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. ठाण्यातील बलाढ्य राजकीय नेते , त्यांच्या बरोबरीचे धनाढ्य बिल्डर, सत्तेच्या तुकड्यासाठी चाललेली पक्ष, संघटनांमधील स्पर्धा, हे सारं वाढतच आहे. त्यामुळं ठाण्यात जातीय तेढ, स्थानिक विकास प्रकल्प वाद, वादग्रस्त कंत्राटे, पुनर्विकास, जमीन आणि आर्थिक हितसंबंध यांच्याभोवती सुरू असलेला संघर्ष तीव्र आणि हिंस्त्र होताना दिसतोय. आणि म्हणुनच तो थेट कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनला आहे.
एखाद्या मोठ्या राजकीय कार्यकर्त्याला कार्यालयात घुसून संपवता येत असेल, तर सामान्य नागरिकाचा उद्रेक होणारच, त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. समर्थकांची गर्दी आणि कुटुंबीयांचा संताप हा केवळ भावनिक उद्रेक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. आमचे बदलते सामाजिक वास्तव आहे. आपण सारे जाणतो की, पैसा, दादागिरी आणि सत्ता या ‘त्रिसूत्री’भोवती आमचे राजकारण फिरत आहे. किंबहुना या त्रिसूत्रीनेच आमचे राजकारणी बांधले गेले आहेत. एकेकाळी, “ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा”, असे सांगणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, आता त्यांच्या अनुयायांना सुद्धा पटणार नाहीत. अशी स्थिती निर्माण झाली आहे, मग इतरांचे काय बोलावे…?
पण या खुनाचा संबंध ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांशी लावला जातोय, ते राज्यासाठी निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे.

एकीकडे वादग्रस्त सचिन वाजे साडेपाच वर्षानी सुटून येणे आणि दुसरीकडे त्याच दिवशी ठाण्याच्या उबाठा विभागप्रमुखाची हत्या होणे या संघटनेच्या अस्तित्वाला आव्हान देणार्‍या दोन वेगळ्या गोष्टी. त्यामुळेच या प्रकरणाला राजकीय रंग देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सक्रिय झाले आहेत. ते कमी म्हणून की काय, उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक बैठक बोलावण्याची बातमी सुद्धा चर्चेत आहे. आज ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीत ते ऑनलाईन सहभागी झाले. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर ‘इंडिया आघाडी’ आक्रमक होत असून ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चाही जाहीर करण्यात आला आहे.
अशा वेळी मुंबईतील उद्धव सेनेच्या विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक महत्वाची ठरते. पूर्णेकर हत्या, मुंबईतील आगामी आंदोलन आणि बदलते राजकीय वातावरण या सगळ्यांचा प्रभाव आता वाढत जाणे साहजिक आहे …
म्हणूनच , पूर्णेकर यांच्या हत्येचा सूत्रधार कोण, हत्येचा नेमका हेतू काय, आर्थिक व्यवहार किंवा विकास प्रकल्पांशी त्याचा संबंध आहे का आणि हल्लेखोरांना कोणाचे संरक्षण होते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांसह जनतेसमोर आली पाहिजेत…!

महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

•

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *