यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, त्याचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे थंडगार पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ‘गरिबांचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची बाजारपेठेत जोरदार मागणी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी सज्ज झाले असून, विक्रेत्यांना यंदा काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये सध्या रांजण, नळ असलेले माठ, रांजणी आणि साध्या माठांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाइन्समुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. परंपरागत काळ्या माठांसोबतच राजस्थान आणि गुजरातमधून आणलेल्या आकर्षक नक्षीदार लाल माठांनाही चांगली मागणी मिळत आहे. काही वर्षांपूर्वी घराघरांत माठाचे महत्व होते. माठातील थंडगार आणि चविष्ट पाणी प्रत्येकाला आवडायचे. मात्र, काळानुरूप फ्रीज आणि मिनरल वॉटरच्या सोयींनी त्यांची जागा घेतली. तरीही, आजही अनेकांना माठातील पाण्याचा नैसर्गिक थंडावा अधिक प्रिय वाटतो. त्यामुळे बाजारात पुन्हा माठांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे.
सध्याच्या तापमानवाढीचा परिणाम माठांच्या किमतींवरही दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किंमतीत थोडी वाढ झाली आहे.
•नळ असलेला माठ – ₹२००
•रांजण – ₹३०० ते ₹४००
माठांची वाढती मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी विविध प्रकार सादर केले आहेत. काही बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असून, लोक मोठ्या प्रमाणावर माठ खरेदी करत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक लोक माठातील पाण्याला प्राधान्य देत आहेत. वाढत्या तापमानात माठातील पाणी आरोग्यास फायदेशीर मानले जाते. फ्रीजमधील अतिथंड पाण्यामुळे घसा दुखण्याचा धोका असतो, तर माठातील पाणी नैसर्गिक थंड असते आणि शरीरासाठी उपयुक्त असते.
अलीकडच्या काळात जारच्या पाण्याची घरपोच सेवा वाढल्यामुळे काही ग्राहकांनी त्याकडे वळण्याचा कल दर्शवला आहे. त्यामुळे माठ विक्रेत्यांना काहीसे नुकसान सहन करावे लागत आहे. माठ घडविणारे संतोष दळवी सांगतात, उन्हाळ्यात लोक नैसर्गिक थंडगार पाण्यालाच पसंती देतात. जारचे पाणी सहज उपलब्ध असले तरी माठातील पाण्याचा स्वाद आणि थंडावा काहीसा वेगळा असतो. बाजारात सध्या माठांच्या पारंपरिक वारशाला पुनरुज्जीवन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक थंडपणामुळे लोक पुन्हा माठांकडे वळत आहेत. विविध रंग, आकार आणि डिझाइन्समुळे माठांची आकर्षकता वाढली असून, ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
Leave a Reply