मुंबई – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ कार्यरत असणाऱ्या ‘आत्रेय’ ह्या संस्थेच्यावतीने महाराष्ट्राच्या लोककलांचा समृद्ध वारसा अभ्यासपूर्ण मेहनतीने सादर करणाऱ्या ‘फोल्क आख्यान’ ह्या प्रयोगाचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम राजेंद्र पै ह्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. दरम्यान आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यासमोर ‘फोक आख्यान’ला रुपये एक लक्ष एक हजार एक(रुपये १०१००१/-)ची देणगी ‘आत्रेय’तर्फे देण्यात आली. त्याप्रसंगी ‘फोल्क आख्यान’तर्फे संयोजक भूषण मेहेरे ,लेखक ईश्वर अंधारे, संगीतकार हर्ष राऊत व विजय कापसे आणि कलाकार ऋषिकेश रिकामे, शाहीर चंद्रकान्त माने, अनुजा देवारे तसेच सौ. बीना पै व अक्षय पै उपस्थित होते.
अलीकडच्या काळात लोकसंगीत या कला लोप पावत चालल्या आहेत असं चित्र दिसत आहे. लोकसंगीत हे महाराष्ट्राचं वैभव! अभंग, भारूड, लावणी, गवळणी असे लोकसंगीताचे कितीतरी प्रकार समाजात रुजलेले आहेत. मात्र असं असताना २० हौशी तरुण रंगकर्मी एकत्र येऊन लोककला एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर करून आपलं वैभव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न म्हणजेच ‘द फोक आख्यान’ हा सांगीतिक कार्यक्रम!
‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आताच्या पिढीला आवडेल अशा स्वरूपात त्यांनी लोककला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकही जुनं गीत न घेता, नवीन गीतं लिहून त्यांना चाली दिल्या आहेत. यातील सगळी गीतं ईश्वर अंधारे यानं लिहिली असून हर्ष विजय यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘सर्व वयोगटातील लोकांना रुचतील अशी गाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. नव्या जुन्याचा मेळ साधत गवळण, भारूड, लावणी हे प्रकार सादर करतात. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसंगीताचा सखोल अभ्यास केला आहे.
Leave a Reply