बदलापूर: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या कोठडीतील मृत्यूस पाच पोलिस जबाबदार असल्याचे दंडाधिकारी चौकशीत निष्पन्न झाले आहे. यावरून या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अक्षय शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांनी त्यांच्या मुलाला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, दंडाधिकाऱ्यांनी सोमवारी आपला चौकशी अहवाल सीलबंद स्वरूपात मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने अहवालाचा अभ्यास करून सरकारला चौकशीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, हेडकॉन्स्टेबल अभिजीत मोरे आणि हरीश तावडे तसेच एक पोलीस चालक यांचा समावेश आहे. दंडाधिकारी चौकशी अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा जबाबदार असून परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आल्याचे स्पष्ट होते. तसेच, फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार आरोपीच्या पिस्तुलावर त्याचे बोटांचे ठसे आढळले नाहीत आणि गोळीबाराच्या पुराव्यांचीही पुष्टी झाली नाही.
२०२४ मध्ये बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. मात्र, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दावा केला होता की, त्याने पोलिस कर्मचाऱ्याकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला होता, ज्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी कोणत्या तपास यंत्रणेमार्फत होईल याबाबत दोन आठवड्यांत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दंडाधिकारी अहवालानुसार संबंधित पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने संबंधित सर्व कागदपत्रे आणि साक्षीदारांचे जबाब सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारने यावर तत्काळ कार्यवाही करून आरोपीच्या मृत्यूसंदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूस पाच पोलिस जबाबदार, गुन्हा दाखल होणार?
•
Please follow and like us:
Leave a Reply