रायगडमधील राजकारणात मोठा भूकंप! जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील भाजपमध्ये; हजारोंचा पाठिंबा

रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण करणारी घटना आज (१६ एप्रिल) घडली. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. या घडामोडींमुळे शेकापला रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय झटका बसण्याची शक्यता आहे. पंडित पाटील यांनी भाजपात प्रवेश करताना स्पष्टपणे सांगितले की, “माझ्या प्रवेशामुळे भाजप रायगडमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे. माझ्या सोबत उभ्या असलेल्या जनसमूहामुळे पक्षाला निश्चितच फायदा होईल.” तसेच, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील काय आहे, हे सर्वांना दिसेल,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टोला लगावला.

भाजप प्रदेश कार्यालय, मुंबई येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षालाही रायगड जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातील माजी शिवसेना जिल्हा प्रमुख आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल नवगणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला. हा कार्यक्रम मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, आशिष जैस्वाल, आमदार महेंद्र थोरवे, राजन साळवी आणि तुकाराम काते यांची उपस्थिती होती.

राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या संघटन विस्ताराचे सत्र वेगाने सुरू असून कोल्हापूर, अहमदनगर, ठाणे, सातारा अशा प्रमुख जिल्ह्यांतील काँग्रेस, ठाकरे गट (युबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे स्थानिक नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे १२ नगरसेवक व माजी नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री हिरे कुटुंबातील प्रशांत हिरे यांचाही भाजपप्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. साताऱ्यातही रामराजे निंबाळकर गटाला भाजपने मोठा झटका दिला आहे. या सर्व पक्षप्रवेशांमुळे राज्यातील भाजपचे संघटन अधिक भक्कम होत असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विस्तार जोमात सुरू आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *