भाजपचे हिंदुत्व हे एक मोठे खोटे कथानक असून त्यामागे केवळ सत्ता आणि स्वार्थ आहे,” असा घणाघात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या अण्णा द्रमुकशी दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युती केली.संघमुक्त भारत म्हणणारे नीतीशकुमार, भाजपच्या प्रमुख नेत्यांना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू नायडू आदींशी युती केली.
भाजपने हिंदुत्वासाठी कसे काहीच केले नाही, हे पुस्तिकेद्वारे उघडे पाडणार असल्याचा निर्धार शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. भ्रष्टाचार केला म्हणून कोणी भ्रष्ट होत नाही, सावली पडली म्हणून कोणी बदलत नाही. आमचे हिंदुत्व इतके तकलादू नाही. राज्यात मराठी आणि देशात हिंदू –असे आमचे हिंदुत्व आहे, असे स्पष्ट करत ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाला पुन्हा एकदा नकार दिला.
भाजपच्या ढोंगीपणावर पुस्तिका काढणार
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले की, भाजपने हिंदुत्वासाठी काहीही केलेले नाही, उलट त्यांच्या दुटप्पी धोरणांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठी लवकरच एक माहितीपुस्तिका प्रकाशित केली जाईल.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, तरी ते आजवर पूर्ण झालेले नाही. राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे नाहीत. राज्यातील काही मंत्र्यांकडे दोन बंगले आहेत, त्यापैकी एक राज्यपालांना देऊन, राजभवनच्या जागेवर भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
दलित सरसंघचालक कराल का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी मुस्लीम व्यक्तीला पक्षाचे अध्यक्ष करून दाखवावे, असे आव्हान एका कार्यक्रमात दिले होते. त्यावर निर्धार शिबिरात उध्दव ठाकरे यांनी दलित व्यक्तीला सरसंघचालक करणार का, असा प्रश्न भाजपला केला
निर्धार शिबिरात झाले काय?
शिबिरात आम्ही इथेच, महाराष्ट्र कुठे चाललाय ?, मतदानकेंद्र व्यवस्था व मतदार यादी, संघटनेचा आत्मा आणि पुनर्बाधणी, मी शिवसेनेबरोबर का?, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हद्दीत घुसखोरी, कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस, बनावट कथानक व लोकशाही या विषयांवर मार्गदर्शन व मंथन झाले.या शिबिरात खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, माजी खासदार राजन विचारे, चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार आदित्य ठाकरे आदींचा सहभाग होता.
Leave a Reply