छत्रपती शिवाजी महाराजांविषयी परकीय लेखकांनी केलेल्या नोंदींचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध करावा, अशी इच्छा शंभर वर्षांपूर्वी बंगाली इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांना झाली. मात्र, त्याच काळात आपण मराठी नागरिक मात्र शिवस्मारकाचे काम कोणत्या जातीच्या शिल्पकाराकडून करावे, यावर अडकलो होतो. यामुळेच मराठी समाज जातीवादात अडकून मागे पडला आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
कृष्णा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. गणेश राऊत, कृष्णा पब्लिकेशनचे अनिल पवार आणि पुस्तकाचे संपादक चेतन कोळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळातच त्यांची कीर्ती जगभर पसरली होती, असे विचार प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी मांडले. कार्यक्रमाची सुरुवात चेतन कोळी यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर सूत्रसंचालन अक्षय वाटवे यांनी केले.
Leave a Reply