बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) स्मशानभूमी व्यवस्थापनात मोठा बदल करत, आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ही जबाबदारी थेट वॉर्ड कार्यालयांकडे सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवारी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले.
नव्या व्यवस्थेनुसार, स्मशानभूमींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता वॉर्ड कार्यालयांकडे असेल. मात्र, मृत्यू प्रमाणपत्रे जारी करणे, लाकूड व अन्य साहित्य पुरवठा करणे, मुस्लिम दफनभूमीसाठी आवश्यक आच्छादन पुरवणे आणि दफन शुल्क निश्चित करणे यासारखी कामे आरोग्य कार्यकारी अधिकारी (EOH) यांच्या अखत्यारीत राहतील.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या नव्या व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी २५ प्रशासकीय वॉर्डांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली.
दादर स्मशानभूमीच्या पाहणीत काही मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर, बीएमसीने तातडीने जबाबदाऱ्या वॉर्ड कार्यालयांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विस्कळीत होणे आणि दुरुस्ती प्रक्रियेत होणारा विलंब या समस्या वारंवार समोर येत होत्या. यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (MOH) मंजुरी प्रक्रियेमुळे कामं संथगतीने सुरू होती.
यावर उपाय म्हणून, वॉर्ड कार्यालयांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत. अभियंते असलेल्या वॉर्ड कार्यालयांना जबाबदारी दिल्यास, पुनर्विकास आणि दुरुस्ती प्रक्रियेत अधिक वेग येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आता स्मशानभूमींसाठीचा अर्थसंकल्प वॉर्ड स्तरावरच निश्चित केला जाईल. पूर्वी आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेली प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया देखील आता वॉर्ड कार्यालयांमार्फत गतीमान केली जाईल. याशिवाय, नागरिकांसाठी सुविधांची उपलब्धता अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर करण्यासाठी बीएमसीच्या आयटी विभागाला एका विशेष मोबाईल अॅपच्या विकासाचा आदेश देण्यात आला आहे. हे अॅप स्मशानभूमीतील सेवा, उपलब्धता आणि वास्तविक वेळेतील (real-time) माहिती नागरिकांना पुरवेल.
- बीएमसीचे आयटी संचालक शरद उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अॅप विकसित केले जाणार आहे. यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास आणि गैरसोयीचा त्रास टाळता येईल. उदाहरणार्थ, पारशीवाडा स्मशानभूमी बंद असल्यास, तिथे जाण्यापूर्वीच नागरिकांना त्याची माहिती मिळेल. या नव्या व्यवस्थेमुळे स्मशानभूमी व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना जलद व सुलभ सेवा मिळेल, असा विश्वास बीएमसी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Leave a Reply