स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये ते एक विडंबनात्मक गाणं सादर करत असून, त्यात ‘गद्दार’ हा उल्लेख आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केल्याने या प्रकरणावर नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
कुणाल कामराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते एक गाणं गाताना दिसतात. गाण्यात त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलेलं नसले तरी, अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधल्याचं स्पष्ट जाणवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे काही घडलं त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आधी शिवसेना भाजपपासून वेगळी झाली, नंतर शिवसेना शिवसेनेतून फुटली, मग राष्ट्रवादी काँग्रेसही विभागली. मतदारांना एकाच वेळी नऊ वेगवेगळ्या पर्यायांमध्ये मतदान करावं लागलं, त्यामुळे संपूर्ण गोंधळ निर्माण झाला. आणि हे सगळं सुरू केलं एका व्यक्तीनं, जो मुंबईच्या शेजारील मोठ्या शहरातून – ठाण्यातून येतो!” अशा शब्दांत कुणाल कामराने आपल्या गाण्याची सुरुवात केली.
‘दिल तो पागल है’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘भोली सी सूरत’ च्या चालीवर त्यांनी गायलं – “मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये!” या गाण्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. कुणाल कामराचा हा व्हिडीओ संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्यांनी “कुणाल की कमाल! जय महाराष्ट्र!” असे लिहीत या व्हिडीओला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
संपूर्ण व्हिडीओत कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलेलं नाही. मात्र, गाण्यातील शब्द आणि संदर्भ पाहता हा अप्रत्यक्ष टोला थेट त्यांच्यासाठीच आहे, असे जाणवत आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंडखोरीचे नेतृत्व करत शिवसेनेच्या ४० आमदारांसह वेगळा गट तयार केला आणि भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३७ जागांवर विजय मिळवला. सध्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद भूषवत आहेत.कुणाल कामराच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या टीकेमुळे कामराच्या अडचणी वाढू शकतात, असे बोलले जात आहे. आता या प्रकरणावर शिंदे गट किंवा भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply