उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज तहसीलमधील क्योलडिया गावात एका लग्नसोहळ्यात अशी घटना घडली, की तिची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे. दारूच्या नशेत धुंद झालेल्या वराने वधूऐवजी करवलीच्या गळ्यात वरमाला घातली! या घटनेनंतर स्टेजवरच जोरदार गोंधळ उडाला. वधू संतापली, तिने थेट वराच्या कानाखाली मारली आणि लग्न करण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली आणि अखेर हे लग्नच रद्द करण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
शनिवारी संध्याकाळी बरखेड़ा गावाहून वराची वरात नवाबगंजच्या क्योलाडिया गावात आली. सगळं सुरळीत सुरू होतं, पण वराच्या मित्रांनी त्याला चांगलंच मद्यप्राशन करवून दिलं. परिणामी, वर नशेत गेला आणि स्वतःवरचा ताबा गमावला. मध्यरात्री वरमाला समारंभ सुरू झाला. वधूने आपल्या नवऱ्याच्या गळ्यात प्रेमाने माळ घातली. आता वराची पाळी होती, पण तो नशेत असल्याने त्याला नेमकं काय करायचं आहे, हेच कळेना! स्टेजवर वधूच्या शेजारी करवली उभी होती. दारूच्या नशेत बधीर झालेल्या वराने चक्क वधूऐवजी करवलीच्या गळ्यात घातली वरमाला .
गोंधळ, हाणामारी आणि लग्न रद्द!
हा प्रकार पाहताच वधू संतापली. तिने कोणतीही तडजोड न करता थेट वराला जोरदार कानशीलात लगावली आणि स्टेजवरून निघून गेली. ती ठाम होती ‘माझ्या आयुष्यात व्यसनाधीन व्यक्तीला जागा नाही’ यामुळे दोन्ही कुटुंबीय संतापले आणि वाद इतका वाढला की, लग्नमंडपचा अखाडा बनला! खुर्च्या, टेबलं उलथून टाकण्यात आली, हाणामारी झाली. पाहता पाहता लग्नाची वरात परत गेली.
पोलिस कारवाई आणि वराचा गजाआड प्रवास
दुसऱ्या दिवशी रविवारी पोलिस ठाण्यात हा गोंधळ पोहोचला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत, शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली वराला अटक केली. एवढंच नव्हे, तर त्याला दारू पुरवणाऱ्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. सर्व चर्चेनंतरही वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्न करण्यास साफ नकार दिला.
Leave a Reply