दिल्लीतील RSS चं नवं कार्यालय – १२ मजले, ३ टॉवर आणि १५० कोटींचा खर्च! पाहा सविस्तर माहिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नवीन मुख्यालयाचे उद्घाटन बुधवारी, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. शिवजयंतीच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या अत्याधुनिक कार्यालयाचे लोकार्पण झाले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
नवी दिल्लीतील झंडेवालान भागात उभारलेले हे १२ मजली कार्यालय भव्य स्वरूपात बांधण्यात आले आहे. या इमारतीत ३ टॉवर असून, ३०० खोल्या, मोठे सभागृह आणि भोजनालय यांची सुविधा आहे. कार्यालय उभारण्यासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, जवळपास ७५,००० कार्यकर्त्यांनी निधी उभारणीसाठी योगदान दिले आहे.

संपूर्ण इमारतीची रचना आणि विशेष वैशिष्ट्ये
– कार्यालय ४ एकर जागेत उभारण्यात आले आहे.
– इमारतीतील ३ टॉवरपैकी पहिल्या टॉवरचे नाव “प्रेरणा” तर दुसऱ्याचे “अर्चना” ठेवण्यात आले आहे.
– G+१२ मजली संरचनेमध्ये यांत्रिक पद्धतीने २७० कार पार्किंगची सुविधा आहे.
– दहाव्या मजल्यावर ग्रंथालय असून, त्यात ८,५०० पुस्तकांचा संग्रह आहे.
– तळमजल्यावर एक क्लिनिक असेल, जिथे ५ बेडची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल.
– नवव्या मजल्यावर १२० लोक बसू शकतील अशी पत्रकार परिषदेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
– भारतीय स्थापत्यशैलीनुसार बांधलेली ही वास्तू पर्यावरणपूरक आहे. संपूर्ण कार्यालयाच्या वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.

RSS चे जुने मुख्यालय १९३९ मध्ये “केशव कुंज” नावाने स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर १९६२ मध्ये हे कार्यालय दोन मजली करण्यात आले. आता, नव्या वास्तूमध्येही त्याच नावाचा वारसा पुढे नेण्यात आला आहे. या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच, कार्यालयातील सर्व दरवाज्यांच्या चौकटी ग्रॅनाइटच्या तयार करण्यात आल्या आहेत.
RSS चे सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्यासाठी येथे निवासाची विशेष व्यवस्था आहे. यासोबतच, ८० जण एकाच वेळी भोजन करू शकतील अशा भोजनालयाची सुविधा आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता असून, RSS च्या कार्यासाठी ही वास्तू नव्या उर्जेचे प्रतीक ठरणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *