देवनार-गोवंडीतील अनधिकृत आरएमसी प्लांटमुळे प्रदूषणाचा कहर; महापालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून, प्रदूषणाच्या समस्येवर मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. विशेषतः देवनार, गोवंडी, शिवाजी नगर आणि मानखुर्द परिसरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. देवनार हा प्रदूषणाच्या बाबतीत सर्वाधिक धोकादायक ठरत असून, वाढत्या धुळीमुळे स्थानिक नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणासाठी डम्पिंग ग्राउंडसोबतच अनधिकृतपणे चालणाऱ्या आरएमसी प्लांट्स जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात शिवसेना (उबाठा) खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या आरोपांनुसार, महापालिका अधिकारी जाणूनबुजून या अनधिकृत प्लांट्सवर कोणतीही कारवाई करत नाहीत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार, आरएमसी प्लांट्स लोकवस्तीपासून सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र, देवनार, गोवंडी, शिवाजी नगर आणि मानखुर्द या गजबजलेल्या भागांमध्येच हे प्लांट्स धडधडीतपणे कार्यरत आहेत.
स्थानिकांच्या मते, इंडिया क्रियेट आरएमसी गोवंडी, डायनामिक आरएमसी देवनार, आरडीसी काँक्रीट आरएमसी, आणि श्री सिमेंट आरएमसी गोवंडी हे सर्व प्लांट्स अनधिकृतरित्या सुरू असून, कायद्याचे सर्रास उल्लंघन करत आहेत. यामुळे परिसरात सतत सिमेंट आणि धुळीचे प्रदूषण निर्माण होत असून, स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत. तसेच, पावसाळ्यात या प्लांटमधून निर्माण होणारा कचरा नाल्यांमध्ये साचतो, परिणामी पाणी तुंबून पूरस्थिती निर्माण होते.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी थेट खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे १९ जून २०२४ रोजी एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि अनधिकृत आरएमसी प्लांट्स बंद करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यानंतर, १४ जानेवारी २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी तक्रार देण्यात आली. तरीही महिना उलटूनही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. महापालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार धोरणांमुळे प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला असून, अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप खासदार संजय दिना पाटील यांनी केला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *