संत तुकाराम महाराजांनी जीवनाचे तत्त्वज्ञान अभंगांच्या माध्यमातून सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचवले. वारकरी संप्रदाय त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला
या पुरस्काराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ज्ञानेश्वर-माउली आणि तुकाराम महाराजांच्या जयघोषातूनच प्रेरणा मिळते. संतांच्या अभंगांमधून रंजले-गांजलेल्यांची सेवा करण्याचे बळ मिळते.नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराजांची मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
शिंदे म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी भेदभाव न करता लोकहितासाठी कार्य करण्याचा संदेश दिला आहे. शासन त्यांच्या शिकवणीप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी न्याय, सुख-समाधान देण्याचे काम करत आहे. राज्याच्या विकासासाठी आणि वारकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करत आहे. त्यांनी पुढे सांगितले, देहू येथील वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येतात. यासाठी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेदरम्यान दर्शनासाठी रांगा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
निसर्गाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. ही चळवळ लोकचळवळ व्हावी आणि महाराष्ट्रातील नद्यांचा देशात आदर्श निर्माण व्हावा,असे आवाहनही शिंदे यांनी केले.
तुकाराम गाथा ई-बुकच्या रूपात
संत तुकाराम महाराजांची गाथा तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी मराठी भाषा विभागाकडून ती ई-बुक स्वरूपात तयार केली जात आहे. लवकरच हे ई-बुक सर्व शाळांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. निर्मल वारी आणि हरित वारीसारख्या संकल्पना प्रत्यक्षात राबवून त्यांनी पर्यावरण पूरक वारीला चालना दिली. या कार्यक्रमाला देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.पस्थित होते.
Leave a Reply