श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरातील पुढील चार महिन्यांसाठीच्या सर्व राजोपचार पूजांचे ऑनलाईन बुकिंग अवघ्या काही तासांतच संपुष्टात आले आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ७५ लाख रुपयांच्या देणगीसह पूजांचे संपूर्ण बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
आज सकाळी ११ वाजता मंदिरे समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग सुरू होताच, अवघ्या सात तासांतच सर्व पूजा हाऊसफुल्ल झाल्या आणि विठुरायाच्या चरणी ७५ लाख रुपयांची भक्तीअर्पण झाली. यात नित्य पूजा, चंदनउटी पूजा तसेच पाद्य पूजा व तुळशी पूजेच्या बुकिंगचा समावेश होता.
विठ्ठलाच्या पूजांचे वेळापत्रक:
• पहाटे ४:३० वाजता – नित्य पूजा (एका कुटुंबातील पाच भाविकांना प्रवेश)
• रात्री १०:३० वाजता – पाद्य पूजा
• सकाळी १० वाजता आणि दुपारी ४ वाजता – तुळशी पूजा
• गुढीपाडव्यापासून उन्हाळ्यातील तीन महिने – दररोज दुपारी ४ वाजता चंदनउटी पूजा
पूर्वी विठ्ठलाच्या पूजेसाठी भाविकांना तब्बल एक वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, तिन्ही महिने आधी सुरू झालेल्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीमुळे पूजांसाठी आता तीन महिन्यांपर्यंत बुकिंग उपलब्ध करण्यात येते. या नव्या प्रणालीला भक्तांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने पुढील चार महिन्यांसाठीच्या सर्व पूजांचे बुकिंग पूर्ण झाले असून, वारकरी भाविकांना आता नव्या बुकिंगसाठी आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, ऑनलाईन बुकिंगसंदर्भात काही ई-सेवा केंद्र आणि खासगी व्यक्तींकडून भाविकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस बळी न पडता, भाविकांनी थेट मंदिर समितीकडे संपर्क साधावा. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Leave a Reply