विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे सेनेतून आऊटगोइंग मोठ्याप्रमाणात सुरू झाली होती. आता आणखी एक मोठी बातमी समोर येतेय ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महविकास आघाडीशी पंगा घेतला होता. त्याच चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रहार पाटील ठाकरेंना सोडणार का? याबाबत देखील चर्चा रंगल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडांवर राज्यात पुन्हा एकदा विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. विविध पक्षप्रवेश, युती आणि आघाडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युती करण्याचा अप्रत्यक्ष प्रस्ताव दिला होता. उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंचा प्रस्ताव मान्य करत एक पाऊल पुढे टाकलं होतं. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी घडामोड समोर आली.
चंद्रहार पाटील सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राज्य संघटक पदावर कार्यरत आहेत. ते पैलवान देखील असून दोन वेळा महाराष्ट्र केसरी देखील राहिले आहेत. उबाठा गटाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी मतभेत करून संगलीतून उमेदवारी दिली होती. चंद्रहार पाटलांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहून पराभव केला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे.
गुरुवारी (24 एप्रिल) रात्री उशिरा ही भेट झाली. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं म्हटलं जातंय. या भेटीवर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी आणि उदय सामंत यांची भेट झाली, असं चंद्रहार पाटलांनी सांगितलं आहे.
Leave a Reply