मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी एका चालकाला अटक केली. त्याने शनिवारी रात्री एका परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. २३ वर्षीय ही महिला परदेशी लष्करी तुकडीचा भाग असून, ती राजनैतिक मोहिमेसाठी भारतात आली होती. शनिवारी रात्री ती बॉम्बे पोर्ट ट्रस्टजवळ उभ्या असलेल्या आपल्या जहाजावर परत जात असताना हा प्रकार घडला. महिलेने प्रसंगावधान राखत आरोपीचा फोटो काढला, त्यावरून पोलिसांनी त्याला ओळखून ताब्यात घेतले.
काय घडले नेमके?
तक्रारदार महिला आपल्या दोन सहकाऱ्यांसह दक्षिण मुंबईतील फूड फेस्टिव्हलला गेली होती. त्यानंतर तिघेही एका कॅफेमध्ये गेले आणि नंतर टॅक्सीने इंदिरा डॉक, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट येथे परतले. तेथील प्रक्रियेनुसार, चालक त्यांना टेंपो ट्रॅव्हलरने गेटपासून जहाजापर्यंत सोडतो. आरोपी अनिल कांबळे यांने प्रथम महिलेच्या दोन सहकाऱ्यांशी हस्तांदोलन केले. मात्र, महिलेचा हात मिळवताना उजव्या हाताने हात मिळवून डाव्या हाताने तिच्या शरीराला अनुचितरित्या स्पर्श केला. महिलेने त्वरित त्याला दूर लोटले आणि त्याचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. जहाजावर पोहोचल्यानंतर तिने भारतीय अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत ती यलो गेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आरोपीविरोधात FIR दाखल करण्यात आला.
पोलीस तपास आणि कारवाई
मुंबई पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीचा शोध घेतला आणि रविवारी सकाळी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
Leave a Reply