मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिमा त्यांच्याच नेत्यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे डागाळली आहे. विशेषतः आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे शिंदे अडचणीत आले आहेत. या नेत्यांच्या कारनाम्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने शिंदे कमालीचे नाराज असून, त्यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिल्याचे समजते.आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने नवा वाद निर्माण झाला. जेवण खराब मिळाल्याच्या रागातून त्यांनी कर्मचाऱ्याला “मला विष खायला घालतो का?” असे म्हणत मारहाण केली. याशिवाय त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानेही ते चर्चेत आले होते.
दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांच्या नोटांच्या बंडल असलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत. बेडखाली दिसणाऱ्या या बॅगेबाबत शिरसाट यांनी “बॅगेत कपडे असून, एवढे पैसे ठेवायला अलमाऱ्या काय मेल्यात का?” अशी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले. याशिवाय, आयकर विभागाच्या नोटीशीबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही ते वादात सापडले आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने पक्षाची प्रतिमा खराब होणे शिंदेंना परवडणारे नाही. यापूर्वीही मंत्री भरत गोगावले यांचे जादूटोणा प्रकरण आणि खासदार संदिपान भुमरे यांचे दारू परवाना प्रकरणामुळेही शिवसेना वादात सापडली होती. नेत्यांच्या अशा वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आता या वादग्रस्त मालिका थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply