महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्ब हल्ल्याद्वारे संपवण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलिसांना प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याचा कट रचला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या धक्कादायक माहितीनंतर पोलीस सतर्क झाले असून, संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे. हा धमकीचा ईमेल फक्त गोरेगाव पोलीस ठाण्यापुरता मर्यादित नसून, जे.जे. मार्ग पोलीस ठाणे आणि मंत्रालयातही तो पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासनाने या ईमेलची गंभीर दखल घेतली असून, त्याचा आयपी अॅड्रेस आणि लोकेशन शोधण्याचे काम सुरू आहे. कुणीतरी जाणूनबुजून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? याचाही तपास केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील एका तरुणाने व्हिडिओद्वारे शिंदेंविरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील याआधी अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र तपासानंतर फक्त दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न होता, असे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा आलेल्या धमकीच्या ईमेलमागे कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मुंबई पोलिसांना धमकीचे फोन आणि ईमेल मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही गेटवे ऑफ इंडिया, विमानतळ आणि रेल्वे स्थानक उडवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी ३५० किलो आरडीएक्स पाकिस्तानमधून मुंबईत आणल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पण त्या वेळीही तपासाअंती कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या या नव्या धमकीमागे कुणाचा हात आहे? हा केवळ भीती पसरवण्याचा प्रयत्न आहे की प्रत्यक्षात काहीतरी गंभीर कट रचला जात आहे? या सर्व शक्यतांचा तपास पोलीस घेत आहेत. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका, कार बॉम्बने उडवणार; कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?
•
Please follow and like us:
Leave a Reply