246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. त्यासोबतच आज, 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिकांची मुदत संपली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीप्रमाणे या निवडणुकीत एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. राज्यभरात 13 हजार कन्ट्रोल युनिट्स स्थापित करण्यात आल्या आहेत.

विभागनिहाय आकडेवारीनुसार — कोकण विभागात 17, नाशिकमध्ये 49, पुण्यात 60, संभाजीनगरमध्ये 52, अमरावतीमध्ये 45 आणि नागपुरात 55 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाख, तर क वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मतदारांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नवीन मोबाईल अॅप विकसित केले आहे. तसेच दुबार मतदान रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह दाखवण्यात आले असून अशा मतदारांकडून दुसरीकडे मतदान न करण्याचे लेखी निवेदन घेतले जाणार आहे.

या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय तापमान चढणार असून, स्थानिक पातळीवर सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *