उद्योगपती एलोन मस्क यांच्या टेस्लाने भारतात आपली भरती मोहीम गतीमान केली आहे. महाराष्ट्रात एकूण २० रिक्त पदांसाठी संधी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मुंबईसाठी १५ आणि पुण्यासाठी ५ पदे उपलब्ध आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत टेस्लाची आक्रमक वाटचाल जगातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला, भारतातील विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे.
वाढत्या ईव्ही बाजारपेठेचा फायदा घेत, कंपनीने आपल्या भारतीय उपस्थितीला बळकट करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. टेस्लाने भारतात आपले पहिले कार्यालय पुण्यात स्थापन केले आहे. मर्सिडीज-बेंझ आणि टाटा मोटर्ससारख्या मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या उपस्थितीमुळे पुणे वेगाने ऑटोमोटिव्ह हब बनत आहे. त्यामुळे टेस्लासाठी हे एक महत्त्वाचे आणि रणनीतिक स्थान ठरत आहे.
टेस्लाने भविष्यात भारतात वाहन उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे. सरकारने पुण्याजवळील चाकण आणि चिखली भागातील काही जागा टेस्लासाठी प्रस्तावित केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला मुंबईच्या बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये आपले पहिले शोरूम सुरू करणार आहे. या शोरूमसाठी कंपनीने ४,००० चौरस फूट जागेचा करार केला असून, येथे टेस्लाच्या कार्सचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, टेस्ला या जागेसाठी सुमारे ३५ लाख रुपये मासिक भाडेपट्टा (९०० रुपये प्रति चौरस फूट) भरणार आहे. हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे. कंपनी लवकरच दिल्लीच्या एरोसिटी कॉम्प्लेक्समध्ये आपले दुसरे शोरूम सुरू करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर, भारतात भरतीसाठी नवे पद जाहीर करण्यात आले होते.
टेस्लाचे बीकेसीमध्ये शोरूम सुरू झाल्यानंतर, कंपनी एप्रिलपर्यंत भारतात अधिकृत प्रवेश करून कार विक्री सुरू करू शकते, अशी शक्यता आहे. मात्र, सध्या भारतात उत्पादन युनिट सुरू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. टेस्ला भारतात जर्मनीतील बर्लिन-ब्रँडनबर्ग गिगाफॅक्टरीमध्ये तयार केलेल्या कार्स आयात करेल.
टेस्ला भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, या कारची अंदाजित किंमत २५,००० डॉलर्स (सुमारे २१.७१ लाख रुपये) असू शकते. मात्र, भारतीय आयात धोरणानुसार ती ३६ लाख रुपयांपर्यंत महागू शकते भारत सरकार एप्रिल २०२५ पर्यंत नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करू शकते, ज्यामुळे आयात शुल्क केवळ १५% राहील. यामुळे, टेस्ला भविष्यात भारतात उत्पादन सुरू करण्याची योजना आखू शकते. सध्या चर्चा आहे की, टेस्ला मॉडेल ३ आणि मॉडेल वाय या कार भारतात आणू शकते. मात्र, जागतिक बाजारात या दोन्ही कार्सची किंमत ४४,००० डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, भारतीय ग्राहकांसाठी यांच्या किंमती किती कमी ठेवता येतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply