जम्मू-काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष हल्ल्यात देशातील १५ राज्यांतील पर्यटकांचा बळी गेला असून, महाराष्ट्रालाही मोठी हानी सोसावी लागली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मृतांच्या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्याची तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे.
या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे व संतोष जगदाळे, तसेच पनवेलमधील दिलीप भोसले (६०) यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक राजकीय नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचे बळी गेले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, देशभरातील नागरिक एकत्र आले आहेत. या दुर्दैवी प्रसंगी कुटुंबीयांनी दाखविलेली हिंमत आणि धैर्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आपले जवळचे व्यक्ती गमावल्यानंतरही त्यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचे उदाहरण घालून दिले आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे २०२५) या सहा शूर कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरवण्यात यावे,” अशी मागणी सुळे यांनी केली आहे.तसेच, “जरी गमावलेले भरून न येणारे असले तरी शासनाने कुटुंबातील एका पात्र सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. उदाहरणार्थ, स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी उच्चशिक्षित आहे, तिला तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी. तसेच इतर सर्व पीडित कुटुंबीयांनाही योग्य संधी उपलब्ध करून द्यावी,” अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला या शूर कुटुंबांप्रती आपला सन्मान आणि आधार व्यक्त करण्याची संधी मिळेल,” असेही सुळे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी राज्य सरकारकडून या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.
Leave a Reply