गोव्यातील बीच शॅक्समध्ये इडली-सांबार आणि वडा पावचा वाढता प्रभाव; भाजपा आमदार मायकल लोबोंचा संताप

गोव्याच्या बीच शॅक्समध्ये स्थानिक खाद्यसंस्कृतीऐवजी इडली-सांबार आणि वडा पाव विक्रीला मिळणारे प्रोत्साहन पाहून भाजप आमदार मायकल लोबो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी स्थानिक पदार्थ महत्त्वाचे असून, बाहेरच्या लोकांकडून शॅक्स भाड्याने घेऊन इतर राज्यांची खाद्यसंस्कृती पुढे आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

पर्यटकांना बीचवर इडली-सांबार खायला लावणार का? मायकल लोबोंचा सवाल
आम्ही पाहतोय की गोव्यातील लोक बीच शॅक्स दिल्लीवाल्यांना भाड्याने देत आहेत. काही बंगळुरूकर वडा पाव विकत आहेत, काही जण इडली-सांबार देत आहेत. आता समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्समध्येही हे पदार्थ विकले जात आहेत. याचा अर्थ तुम्ही पर्यटकांना काय सांगत आहात? गोव्याच्या किनाऱ्यावर येऊनही त्यांना इडली-सांबार खायचंय? आपण कोणत्या प्रकारच्या पर्यटनाला प्रोत्साहन देतोय?असा संतप्त सवाल लोबो यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसायात मोठी घट झाल्याचं चित्र आहे. मात्र, यासाठी फक्त सरकारला दोष देऊन चालणार नाही, तर पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांनी आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने घटली आहे. याला अनेक कारणे आहेत. आधीपासून येणारे काही पर्यटक येत असले तरी, नवीन आणि तरुण पर्यटक गोव्याऐवजी अन्य ठिकाणांना प्राधान्य देत आहेत, असं लोबो यांनी नमूद केलं. जर आपण योग्य व्यवस्था निर्माण केली नाही, तर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला काळे दिवस पाहावे लागतील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

‘गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर गोव्यातीलच पदार्थ विकायला हवेत’
लोबोंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, शॅक्समध्ये स्थानिक पदार्थ असायलाच हवेत. इडली-सांबार विकण्याच्या मी विरोधात नाही. ते मुख्य रस्त्यावर उपलब्ध आहे. पण बीच शॅक्समध्ये गोव्याच्या पारंपरिक पदार्थांनाच प्राधान्य दिलं पाहिजे, त्यातून आपली खाद्यसंस्कृती जपली पाहिजे.
शॅक्स भाड्याने देण्याच्या वाढत्या प्रथेवर टीका करत ते म्हणाले, जर शॅक मालकांनी त्यांची शॅक्स भाड्याने दिल्या, तर मग उरलं तरी काय? गोव्याच्या किनाऱ्यावर महाराष्ट्र-कर्नाटकमधली संस्कृती दाखवणार का? शॅक्स हे स्थानिक खाद्यसंस्कृती आणि परंपरा दाखवण्यासाठी आहेत, असं सांगताना लोबोंनी नाराजी व्यक्त केली. आपण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्र, कर्नाटकमधली संस्कृती दाखवणार का? काही शॅक्स हे चुकीची प्रतिमा निर्माण करत आहेत, त्यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पर्यटन वाढीसाठी तातडीची पावले उचलण्याची गरज
पर्यटन विभागाने आणि संबंधित भागधारकांनी एकत्र येऊन परदेशी पर्यटक गोव्यात का येत नाहीत, याचा अभ्यास करावा, असे लोबोंनी आवाहन केले. आज गोव्याला पर्यटक नाकारत आहेत आणि श्रीलंका सारख्या देशांना पसंती देत आहेत. आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा कमी सामर्थ्यवान असूनही, श्रीलंकेच्या पर्यटन व्यवस्थेने पर्यटकांना आकर्षित केलं आहे, असा दावा त्यांनी केला.

समुद्रकिनाऱ्यांवरील कुत्र्यांची समस्या; पर्यटनासाठी मोठा अडथळा?
लोबोंनी समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही प्रकाश टाकला. तुम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय समुद्रकिनाऱ्यावर जाल, तिथे तुम्हाला कुत्रे फिरताना दिसणार नाहीत. मात्र, गोव्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना केली पाहिजे, असेही त्यांनी सुचवले.
गोव्याच्या पर्यटन व्यवसायात होत असलेल्या घसरणीबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा लोबोंनी दिला आहे. पर्यटन क्षेत्राला वाचवायचं असेल, तर स्थानिक खाद्यसंस्कृती, पर्यटकांना योग्य अनुभव देणारी यंत्रणा आणि सुरक्षितता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *