देशभरातील खासगी टॅक्सी सेवांना पर्यायी आणि अधिक पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच ‘सहकार टॅक्सी’ सेवा सुरू करणार आहे. सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत या नव्या योजनेची घोषणा केली असून, या उपक्रमामुळे प्रवासी आणि टॅक्सी चालक दोघांनाही मोठा लाभ होणार आहे.
शहरांमध्ये वाढत्या वाहतुकीसाठी ओला-उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या सेवांबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनियमित भाडेवाढ, मनमानी दर आकारणी आणि चालकांच्या कमी उत्पन्नामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार ‘सहकार टॅक्सी’ सेवा सुरू करत आहे.
‘सहकार टॅक्सी’ सेवा कशी असेल?
• सहकार तत्वावर आधारित राईड-हेलिंग सेवा
• बाईक, तीन चाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा समावेश
• नोंदणीकृत चालकांना कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही
• संपूर्ण उत्पन्न थेट चालकांच्या खात्यात जमा होणार
• प्रवाशांसाठी परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध
अमित शाह यांच्या मते, आत्तापर्यंत खासगी टॅक्सी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात कमिशन उद्योगपतींना जात होते, त्यामुळे चालकांचे उत्पन्न कमी राहत होते. मात्र, सहकार टॅक्सी सेवेमुळे ही परिस्थिती सुधारेल. चालकांना त्यांचे संपूर्ण उत्पन्न मिळेल, तर प्रवाशांना किफायतशीर, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळणार आहे.
‘सहकार टॅक्सी’ योजनेमुळे टॅक्सीचालकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. अनेकांनी या योजनेत नोंदणी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, इंडियन फेडरेशन ऑफ अॅप-बेस्ड ट्रान्सपोर्टने या निर्णयाचे स्वागत केले आहे. खासगी टॅक्सी सेवांच्या मनमानी कारभारामुळे अनेक प्रवासी त्रस्त होते. जर ‘सहकार टॅक्सी’ सेवा यशस्वी ठरली, तर देशभरातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सीचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरेल.
Leave a Reply