नवी मुंबईत चार तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजब स्टंट केला. एमयूव्हीच्या डिकीतून मानवी हात बाहेर लटकत असल्याचा देखावा करत त्यांनी एक व्हिडीओ रील तयार केला. हे दृश्य इतकं वास्तवदर्शी होतं की अनेकांना वाटलं गाडीत कोणाला अपहरण करून नेलं जातंय, किंवा डेड बॉडी ठेवली आहे. पोलिसांनी वेळेवर लक्ष देत या चौघांना ताब्यात घेतलं.सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाशी ते सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्यावरून जात असलेल्या एमयूव्हीच्या डिकीतून एक मानवी हात बाहेर दिसल्याचं एका दुचाकीस्वाराने पाहिलं.त्याने हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केलं.
क्राईम विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांनी सांगितले की, सोशल मीडियावर अशा प्रकारचं व्हिडीओ पोस्ट होताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. अवघ्या दोन तासांत ती गाडी सानपाडा रेल्वे स्थानकाजवळील हावरे फँटासिया मॉलजवळ आढळली आणि संबंधित चार तरुणांना ताब्यात घेण्यात आलं.
या तरुणांची नावे मिन्हाज शेख (२५), शहावर शेख (२४), इन्जमाम शेख (२५) सर्वजण कोपरखैरणेचे रहिवासी, आणि मोहम्मद शेख (३०) — मिरा रोडचा रहिवासी, अशी आहेत.
लांडगे यांनी सांगितले की, चौकशीत त्यांनी गाडी साकीनाका, मुंबई येथील मित्राकडून लग्नासाठी उसनी घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी लॅपटॉप ब्रँडचा प्रचार करण्यासाठी हा रील बनवला, कारण त्यातील एकजण हावरे फँटासिया मॉलमध्ये लॅपटॉप विक्री व रिपेअरिंगचं भाडेतत्त्वावर दुकान चालवत होता.
Leave a Reply