देशभरात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असून, महाराष्ट्रातही तापमान झपाट्याने चढू लागले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत पुढील काही दिवस ‘पिवळा इशारा’ जारी केला आहे. येत्या तीन दिवसांत हवामान अधिक उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ११ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून, विशेषतः सखल व सागरी किनारपट्टीच्या भागांमध्ये ही वाढ त्रासदायक ठरणार आहे.
राजधानी दिल्लीसह इतर राज्यांतही उन्हाळ्याचा जोर जाणवू लागला आहे. दिल्लीत सोमवारी किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिल्लीतही ‘पिवळा इशारा’ जारी केला असून, नागरिकांना दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातही सोमवारी उष्णतेच्या लाटेने हजेरी लावली. ग्वाल्हेर, चंबळ, श्योपूर, गुना, अशोकनगर, दातिया, भिंड, मोरेना तसेच नीमच आणि मंदसौर या भागांमध्ये उष्णतेचा पारा चढू लागला असून, हवामान विभागाने ‘पिवळा इशारा’ दिला आहे. ग्वाल्हेर आणि चंबळ परिसरात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राजस्थानात तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज असून, नैऋत्य भागात तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. तर पूर्व राजस्थानात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना हलक्या, हवेशीर कपड्यांचा वापर करण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि दुपारी अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. उन्हाळ्याचा कडाका लक्षात घेता, आरोग्याच्या दृष्टीने सावधता बाळगणे, थंड राहणे आणि योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
Leave a Reply