मुंबईत यंदाच्या वर्षात प्रथमच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मंगळवारी तापमान वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि आसपासच्या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ठाणे, पालघर, रायगड (नवी मुंबई) आणि रत्नागिरी या भागांनाही हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी, शहरातील कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा ६.८ अंशांनी जास्त होते. IMD कोलाबा येथे दिवसाचं तापमान ३८ अंशांवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ६.९ अंशांनी जास्त होते. तर, किमान तापमान २५ आणि २३.८ अंश नोंदवले गेले, जे अनुक्रमे २.८ आणि ३.७ अंशांनी सरासरीपेक्षा जास्त आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ‘करावं आणि करू नये” यांची यादी सादर करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भाग, विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये ११ मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांतही अशा प्रकारच्या स्थिती वारंवार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काय काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत,” असे BMC च्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी BMC चे मार्गदर्शन:
• तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे.
• हलके, सैलसर आणि सूती कपडे परिधान करावेत.
• बाहेर जाताना सनग्लासेस, टोपी, छत्रीचा वापर करावा.
• मद्यपान, चहा, कॉफी आणि थंड पेये टाळावीत.
• शक्य असल्यास दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे.
Leave a Reply