ईदच्या काळात ‘दंगल आणि बॉम्बस्फोट’ होण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी शहरभर सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत केली आहे. ३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान मुंबईतील काही भाग, विशेषतः डोंगरी परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा एका ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) पोस्टमध्ये देण्यात आला होता. या सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, “काही बेकायदेशीर रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर अशा घटना घडवू शकतात.” या पोस्टमध्ये नवी मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले होते. यानंतर, नवी मुंबई पोलिसांनी तत्काळ मुंबई पोलिसांना सतर्क केले आणि संपूर्ण शहरात सुरक्षेत वाढ करण्यात आली.
पीटीआयच्या अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत.” मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि विशेष शाखेलाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी शहरभर गस्त वाढवली असून, संभाव्य अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी या पोस्टला प्रत्युत्तर देत, “आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. कृपया अधिक माहितीसाठी तुमचा मोबाइल क्रमांक शेअर करा,” असे म्हटले आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, या सोशल मीडिया पोस्टच्या मूळ स्रोताचा शोध घेण्यासाठी सायबर सेलने तांत्रिक तपास सुरू केला आहे. हा इशारा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून, दिल्ली पोलिसांनाही अशाच प्रकारचा संदेश पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. या पोस्टनुसार, “३१ मार्च आणि १ एप्रिल दरम्यान चांदनी चौक, जामा मशिद, जहांगीरपुरी येथे हिंदू-मुस्लिम दंगल किंवा बॉम्बस्फोट होऊ शकतात.” सध्या दिल्ली पोलिस आणि यूपी पोलिसांनी या इशाऱ्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
ईदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आधीच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे आणि कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”
सध्या, सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून, या सोशल मीडिया इशाऱ्याच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply