डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर शहरातील हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर निषेध सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अल्पसंख्याकांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच दर महिन्याला महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेतील प्रमुख निर्णय:
आर्थिक बहिष्कार: मुस्लिम व्यापाऱ्यांकडून खरेदी न करण्याचे ठरवले गेले. ग्राहकांनी दुकानात गेल्यावर दुकानदाराचे नाव विचारावे, आणि नाव न सांगितल्यास त्या दुकानाचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करावा, असा संदेश देण्यात आला.
रिक्षा चालकांची माहिती संकलन: शहरातील मुस्लिम रिक्षा चालकांची माहिती गोळा करावी, तसेच शक्य असल्यास त्यांच्याकडून सेवा न घेण्याचे आवाहन करण्यात आले. घरभाड्याचा विषय: अल्पसंख्याकांना घरे भाड्याने देऊ नयेत, असे ठरवले गेले. महाआरतीचा संकल्प: गुढी पाडव्यापासून दर महिन्याला डोंबिवलीत महाआरती करण्यात येईल. पहिली महाआरती आप्पा दातार चौकात, तर दुसरी आरती प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी कावेरी चौकात होईल.
प्रकरण नेमके काय?
खंबळपाडा परिसरातील आरएसएस शाखेवर रात्रीच्या वेळी दगडफेक झाली होती. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, त्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. टिळकनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी केली असता, चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेला प्रवृत्त केल्याचा आरोप रिजवान सय्यद यांच्यावर ठेवण्यात आला असून, पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
याच प्रकरणावरून कल्याण न्यायालयात आरएसएस आणि मुस्लिम तरुणांच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. यावर महात्मा फुले पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून आधीच चर्चेत असलेल्या सामाजिक तणावात या नव्या घटनेने भर टाकली आहे.


Leave a Reply