होळीच्या सणाचा रंग आणि जल्लोष साऱ्या शहरभर पसरलेला असतानाच, मुंबई पोलिसांनी वाहतूक शिस्तीवर कठोर कारवाई करत विशेष मोहीम राबवली. होलिका दहन आणि रंगपंचमी (१३ व १४ मार्च) या दोन दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १७,४९५ वाहनचालकांना दंडात्मक चलन जारी करण्यात आले असून, तब्बल १.७९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
होळीच्या सणादरम्यान बेजबाबदार वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक तपासणी नाके उभारले होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे यांसारख्या नियमभंगांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. या मोहिमेपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देखील देण्यात आला होता.
मुंबई पोलिसांच्या दोन दिवसांच्या कारवाईत खालीलप्रमाणे उल्लंघनांच्या नोंदी करण्यात आल्या:
• हेल्मेटशिवाय वाहन चालवणे: ४,९४९ प्रकरणे
• मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे: १८३ प्रकरणे
• चुकीच्या दिशेने वाहन चालवणे: ३३ प्रकरणे
• एकेरी मार्गावर वाहन चालवणे: ९९२ प्रकरणे
• तीन जणांसह दुचाकी चालवणे: ४२५ प्रकरणे
• सिग्नल तोडणे: १,९४२ प्रकरणे
• परवान्याविना वाहन चालवणे: ८२६ प्रकरणे
या मोहिमेचा उद्देश वाहतुकीच्या शिस्तीचा भंग करणाऱ्यांना कठोर इशारा देणे आणि शहरातील रस्ते अधिक सुरक्षित बनवणे हा होता.
होळीच्या जल्लोषात मुंबईत उत्साह ओसंडून वाहत असताना काही दुर्घटनाही घडल्या. विविध अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना नागरी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोन जखमींवर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात, तर उर्वरित दोघांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, अनेक जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. मुंबईत होळीचा सण आनंद आणि रंगांनी सजला असला तरी, पोलिसांची कडक कारवाई आणि काही अपघातांनी हा उत्सव काहीसा गडद झाला.
Leave a Reply