पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या तोंडात टॉवेल कोंबून आणि गळा आवळून हत्या करणाऱ्या पतीला अखेर गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. रेखा खातून ऊर्फ रबिया शेख (वय २३) हिची तिचा नवरा रॉयल शेख याने निर्घृण हत्या केली होती. पत्नीचा जीव घेतल्यानंतर तो घराला बाहेरून कडी लावून फरार झाला होता. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी त्याचा शोध घेत अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या. रेखा आणि रॉयल शेख हे मूळचे कोलकाताचे रहिवासी. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाल्यानंतर दोघांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. तबेला चाळ, राम मंदिर, गोरेगाव येथे त्यांनी भाड्याने एक छोटेखानी खोली घेतली आणि मजुरी करून संसार चालवू लागले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. रोजच्या किरकोळ वादातून मोठे भांडण सुरू झाले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रॉयलने याआधीही अनेकदा रेखाला मारहाण केली होती. रविवारी रात्री रेखा आणि रॉयलमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात रॉयलने रेखावर हात उचलला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अधिकच आक्रमक झाला. रेखा जोरजोरात ओरडू लागल्याने त्याने तिच्या तोंडात टॉवेल कोंबले आणि तिचा गळा दाबला. काही क्षणांतच ती बेशुद्ध झाली. तिच्या मृत्यूनंतर रॉयल घाबरला आणि घराला बाहेरून कडी लावून पळ काढला.
फरार होत असतानाच रॉयलने रेखाच्या ओळखीच्या राखी शेख (३५) हिला फोन करून आपली कबुली दिली. ”मी रेखाची हत्या” केली असे त्याने स्पष्ट सांगितले. धास्तावलेल्या राखीने तातडीने रेखाच्या घरी धाव घेतली, तेव्हा ती जमिनीवर निपचित पडलेली होती. तिला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राखीने तत्काळ गोरेगाव पोलिसांना माहिती दिली. तिच्या जबाबावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले. अखेर पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि रविवारी रात्री अटक केली
रॉयलच्या अटकेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा केले. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला टॉवेल जप्त करण्यात आला असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. गोरेगाव पोलिसांनी सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केले.
Leave a Reply