महाराष्ट्रात राहात असाल, तर मराठी भाषा येणं गरजेचं आहे, असं राज्य सरकारचं धोरण असलं तरी काही परप्रांतीय मंडळींना मराठी बोलण्याबाबत अनास्था दिसून येते. काहीजण तर सरळ सरळ, मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा, अशा प्रकारे धमकीच देतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही घटना आहे मुंबईतील चारकोप परिसरातील. एका मराठी तरुणाला एअरटेल नेटवर्कशी संबंधित तक्रार नोंदवायची होती, म्हणून तो एअरटेलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेला. त्याला हिंदी नीटसे बोलता येत नसल्याने तो मराठीत संवाद साधू लागला. मात्र, तिथल्या महिला कर्मचाऱ्याला मराठी समजत नसल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला तिनं गोंधळलेली उत्तरं दिली, पण जेव्हा त्या तरुणाने मराठीतच उत्तर देण्याचा आग्रह धरला, तेव्हा तिचा पारा चढला. महिलेनं सरळ उत्तर दिलं, मी मराठी बोलणार नाही, तुला जे करायचं ते करून दाखव. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर आजूबाजूच्या दुकानदारांनाही बोलावून त्या तरुणाला धमकावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार त्या तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एअरटेलला कडक इशारा दिला आहे. शिवाय, काही शिवसैनिकांनी एअरटेलच्या गॅलरीमध्ये जाऊन या घटनेचा निषेध नोंदवला. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
Leave a Reply