राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. विरोधी पक्षाला लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देण्याची परंपरा कायम ठेवली असली, तरी यंदा शिवसेना (ठाकरे गट) ऐवजी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे नेते इच्छुक होते. ठाकरे गटाकडे विरोधी पक्षातील सर्वाधिक आमदार असतानाही, हे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. विरोधी गटातील राष्ट्रवादीचे रोहित पवार हे या समितीत स्थान मिळवणारे एकमेव सदस्य आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नियम समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. तसेच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे विनंती अर्ज व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्यासंदर्भातील समितीची जबाबदारी आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे ग्रंथालय व वातावरणीय बदल या दोन समित्यांची जबाबदारी आहे. रवी राणा यांना आश्वासन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
महायुतीतील पक्षनिहाय समित्यांचे अध्यक्षपद
भाजप:
• नारायण कुचे – अनुसूचित जाती कल्याण
• मोनिका राजळे – महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण
• किसन कथोरे – इतर मागासवर्ग कल्याण
• शिवेंद्रसिंह राजे भोसले – आमदार निवास व्यवस्था
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – विविध चर्चा
• राहुल कुल – सार्वजनिक उपक्रम
• संतोष दानवे – पंचायत राज
शिवसेना:
• अर्जुन खोतकर – अंदाज
• सुहास कांदे – विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण
• मुरजी पटेल – अल्पसंख्याक कल्याण
• नरेंद्र भोंडेकर – विशेषाधिकार
• चंद्रदीप नरके – अशासकीय विधेयके व ठराव
• डॉ. बालाजी किणीकर – आहार व्यवस्था
• अॅड. आशीष जयस्वाल – धर्मादाय व खासगी रुग्णालये तपासणी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट):
• किरण लहामटे – सदस्य अनुपस्थिती
• सुनील शेळके – रोजगार हमी योजना
• दौलत दरोडा – अनुसूचित जमाती कल्याण
• आशुतोष काळे – मराठी भाषा
• उपमुख्यमंत्री अजित पवार – सदस्य वेतन व भत्ते, सदस्य निवृत्तिवेतन
• प्रताप पाटील चिखलीकर – उपविधान
Leave a Reply