शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पक्षातील मतभेद मिटण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे. कल्याण पश्चिमेनंतर आता पूर्व भागातही दोन गट एकमेकांसमोर ठाकले आणि हा वाद थेट पोलिस ठाण्यातच राड्यात बदलला. विशेष म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच या गटांत जोरदार हाणामारी झाली.
कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर परिसरात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका प्रयत्नशील होत्या. मात्र, शिंदे सेनेचे उपशहरप्रमुख दिलीप दाखिनकर यांनीही या कामासाठी पुढाकार घेतल्याचे सांगताच वाद उफाळला. हा वाद थेट पोलिस ठाण्यात गेला, मात्र समेटाऐवजी तिथेच झटापट झाली! या गोंधळात दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांच्या समर्थकांनी माजी नगरसेविकेच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याआधीही कल्याण पश्चिम भागात शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. माजी नगरसेवक मोहन उगले आणि कार्यकर्त्या राणी कपोते यांच्यात भररस्त्यातच शाब्दिक चकमक उडाली. या संघर्षामागे प्रभागातील राजकीय वर्चस्व आणि आगामी महापालिका निवडणुकीतील उमेदवारी मिळवण्याची चुरस असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण पूर्व भागातील दाखिनकर आणि माजी नगरसेविका हे एकाच प्रभागातील असल्याने या संघर्षामागे प्रभागातील सत्ता हस्तगत करण्याची चढाओढ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्तेच एकमेकांना आव्हान देत असल्याने याचा परिणाम थेट महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.
दाखिनकर यांनी मल्लेश शेट्टी यांच्यावर हल्ल्याचा आरोप केला, मात्र शेट्टी यांनी हा आरोप फेटाळला आहे. दोन्ही गट तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असताना समेटाऐवजी जोरदार हाणामारी झाली आणि पोलिस ठाण्यातच तणाव निर्माण झाला. या प्रकरणात पोलिसांनी लवकरच कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Leave a Reply