काळा घोडा महोत्सव : मुंबईत अवतरणार पॅरिस!

मुंबईतील काळा घोडा परिसरात सुरू झालेल्या कलात्मक पुनर्विकास प्रकल्पामुळे हा परिसर पॅरिसप्रमाणे भासत असला, तरी त्याचा अनोखा वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व कायम ठेवण्यात येणार आहे. काळा घोडा परिसरातील रस्त्यांवर कॅफे-शैलीतील बैठक व्यवस्था आणि खाद्यपदार्थांसाठी खास जागा निर्माण केल्या जात आहेत, ज्यामुळे हा परिसर एक खास आकर्षण केंद्र होईल.
सध्या रिदम हाऊसजवळील व्ही.बी. गांधी रस्ता आणि रदरफिल्ड लेन या दोन रस्त्यांचे पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वार्षिक काळा घोडा कला महोत्सवासाठी या रस्त्यांना नव्या रूपात सादर करण्यात येईल. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जुना सांस्कृतिक वारसा वाढवणे हा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि इलियाहू सिनेगॉग यांचा समावेश असलेल्या या परिसराला ‘कला जिल्हा’ म्हणून ओळखले जाते.
या प्रकल्पाअंतर्गत काळा घोडा परिसरात नवीन पादचारी मार्ग, रस्त्यांवरील फर्निचर, प्रकाशयोजना आणि वाहनतळासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्बन डिझाईन अँड आर्किटेक्चर इनिशिएटिव्हचे संस्थापक आर्किटेक्ट प्रितेश बाफना यांनी सांगितले की, “व्ही.बी. गांधी रस्ता आणि रदरफिल्ड लेनमध्ये भूमिगत सुविधा सुधारण्यात आल्या आहेत. नव्या स्वरूपातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या रस्त्यांवर बेसाल्ट व कोबलस्टोनच्या मिश्रणाने सुशोभीकरण करण्यात आले आहे, जे या परिसराच्या सांस्कृतिक महत्त्वाशी सुसंगत आहे.”
या दोन रस्त्यांसोबतच फोर्ब्स स्ट्रीट, रोप वॉक लेन, साई बाबा रोड आणि बी. भरुचा रोड यांचाही टप्प्याटप्प्याने विकास होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि काळा घोडा प्रिसिंक्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी जवळपास पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात आर्किटेक्ट बाफना यांनी सांगितले की, “सध्या व्ही.बी. गांधी रस्त्याच्या केवळ काही भागांचे पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात उर्वरित रस्त्यांचे काम सुरू केले जाईल.”
कुलाब्यातील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी काळा घोडा परिसराला आठवड्याच्या शेवटी फक्त पादचारी झोनमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विधानसभा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली ही योजना मुंबईतील सौंदर्यवाढीच्या पहिल्या टप्प्याचा भाग ठरेल.
काळा घोडा परिसर आता केवळ कला आणि संस्कृतीसाठीच नव्हे, तर पादचारी व पर्यटकांसाठीही एक अनोखे ठिकाण ठरणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *