मंगळुरूमध्ये २०२२ साली ज्वेलरी दुकान लुटण्याच्या कटात सामील असलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीला पुन्हा अटक करण्यात आली आहे. कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कोटेकर येथील सहकारी बँकेत १७जानेवारी रोजी झालेल्या १८.५ किलो सोने चोरीप्रकरणी त्याचा प्रमुख सहभाग उघडकीस आला आहे.मंगळुरू पोलिसांनी मंगळवारी भास्कर बेलचपडा ६९ याच्या अटकेची घोषणा केली. कोटेकरच्या व्यवसाय सेवा सहकारी संघ बँकेतील तब्बल १२ कोटी रुपयांच्या सोन्याच्या लुटीच्या कटात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेलचपडाचा सहकारी आणि मंगळुरूतील रहिवासी मोहम्मद नाझीर उर्फ हामिद (६५) यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मुंबईतील एका व्यावसायिक गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक पातळीवर मदत केल्याचा आरोप आहे. मंगळुरू पोलिसांनी यापूर्वीच या लुटीतील प्रमुख सहा आरोपींपैकी तीन जणांना अटक केली होती. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथील मुरुगांडी थेवर (३६), योसुवा राजेंद्रन (३५), आणि कन्नन मणी (३५) यांना लुटीनंतर अवघ्या तीन दिवसांत ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान संपूर्ण १८.५ किलो चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले. पोलिस तपासात आरोपींनी शशी थेवर नावाच्या एका वरिष्ठ व्यक्तीने ही लूट नियोजित केल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी तपासाअंती भास्कर बेलचापडाच शशी थेवर असल्याचे उघड केले. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बेलचपडाचा दिल्ली, मुंबई आणि मंगळुरू येथे गुन्हेगारी इतिहास आहे. सध्या तो गुजरातमध्ये राहतो.
मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटेकर बँकेची ही मोठी लूट नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात एकत्र आलेल्या व्यावसायिक गुन्हेगारांच्या टोळीने केली.या गुन्ह्याच्या प्रमुख सुत्रधारांमध्ये भास्कर बेलचापडाची टोळी आणि मुंबईतील मुरुगांडी थेवरच्या गुन्हेगारी टोळीचा समावेश आहे.

कर्नाटक बँकेतील दरोडा; ६९ वर्षीय वृद्ध आणि त्याच्या ६५ वर्षीय सहकाऱ्याला अटक
•
Please follow and like us:
Leave a Reply