दरवर्षी लागणाऱ्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाकडे खगोलप्रेमी तसेच धार्मिक लोक मोठ्या उत्सुकतेने पाहतात. यंदा, म्हणजेच वर्ष २०२५ मध्ये एकूण चार ग्रहणं लागणार आहेत. यामध्ये दोन चंद्रग्रहणं आणि दोन सूर्यग्रहणं असणार आहेत. परंतु यापैकी फक्त एक ग्रहण भारतातून पाहता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया २०२५ मध्ये कोणती ग्रहणं लागणार आहेत आणि कोणतं ग्रहण भारतातून दिसणार आहे.
पहिलं चंद्रग्रहण – भारतातून दिसणार नाही
२०२५ मधील पहिलं ग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण १४ मार्च रोजी लागेल. मात्र, हे ग्रहण भारतीय वेळेनुसार दिवसा लागणार असल्यामुळे भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण अमेरिका, पश्चिम युरोप, पश्चिम आफ्रिका आणि उत्तर तसेच दक्षिण अटलांटिक महासागरातील भागांमध्ये पाहता येणार आहे.
पहिलं सूर्यग्रहण – भारतातून दिसणार नाही
वर्ष २०२५ चे पहिले सुर्यग्रहण अंशत: म्हणजे खंडग्रास ग्रहण असणार आहे. हे सुर्यग्रहण २९ मार्च रोजी लागणार आहे. हे सुर्यग्रहण देखील भारतातून दिसणार नाही. हे सुर्यग्रहण केवळ उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, आईसलँड, उत्तर अटलांटिक महासागर, युरोप आणि उत्तर -पश्चिम रशियात दिसणार आहे.
दुसरं चंद्रग्रहण – भारतातून दिसणार
साल २०२५ मधील दुसरं चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असेल आणि भारतातून पाहता येईल. हे ग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी संपेल. या ग्रहणादरम्यान चंद्र गडद लालसर रंगाचा दिसेल, ज्याला ‘रक्तचंद्र’ (ब्लड मून) म्हणतात. हे ग्रहण आशिया, युरोप, अंटार्क्टिका, पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया आणि हिंद महासागरातील भागांतही दिसणार आहे.
वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण – भारतातून दिसणार नाही
२०२५ चं अखेरचं ग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण २१ आणि २२ सप्टेंबर रोजी लागणार आहे. परंतु, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे आंशिक सूर्यग्रहण न्यूझीलंड, पूर्व मेलानेशिया, दक्षिणी पोलिनेशिया आणि पश्चिम अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे.
Leave a Reply