डोंबिवलीतील एक नामांकित सोसायटीतून एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे सकाळी शाळेत नेत असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. मात्र, अपहरणाची घटना घडल्यानंतर केवळ 3 तासांत पोलिसांनी धाडसी कारवाई करून आरोपींना पकडले आणि मुलाला सुखरूप परत आणले. या जलद कारवाईमुळे अपहरण केलेल्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेले आभार सर्वत्र चर्चेत आले आहेत. मानपाडा पोलिसांनी रिक्षाचालक वीरेन पाटील (25) आणि त्याच्या साथीदारांसह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, अवघ्या साडेतीन तासात मुलाची सुटका केली.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. महेश भोईर हे आपल्या कुटुंबासह डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम सोसायटीत राहत होते. सकाळी, आपल्या 7 वर्षीय मुलाला शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालक नेहमीप्रमाणे घरी आला होता. मात्र, शाळेत पोहोचण्यापूर्वीच मुलाचे अपहरण करण्यात आले. रिक्षाचालक वीरेन पाटील याने आधीच रेकी करून ही घटना घडवली होती. सकाळी 9 वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की, 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून 2 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. आरोपीने खंडणी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच पोलिसांना माहिती देऊ नका असंही सांगितलं होतं.
ही घटना गंभीर मानून मानपाडा पोलिसांनी अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली आणि तत्काळ तपास सुरु केला. पोलिसांनी 5 वेगवेगळी तपास पथके तयार करून आसपासच्या परिसरात शोध घेतला. फिर्यादी महिला, कोमल महेश भोईर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालक वीरेन पाटील याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून शहापूर येथून मुलाची सुखरूप सुटका केली. मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. याच दरम्यान, दोन अल्पवयीन मुलांसह चार आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींविरुद्ध शोध सुरू आहे.
सध्या या गुन्ह्यातील आरोपींची चौकशी सुरू असून, मानपाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि कार्यक्षमता कामी आले आहे. कल्याण विभाग 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे रामचंद्र चोपडे, हेमंत ढोले, स्वाती जगताप यांच्या पथकाने अपहरण झालेल्या बालकाला वाचविण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली.
Leave a Reply