नाशिक : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी सोडला तर सगळे आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. पोलिसांनी त्याची माहिती देण्याऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केले आहे. अनेकदा कृष्णा आंधळे हा जिवंतच नाही, अशा देखील बातम्या समोर आल्या. मात्र आता कृष्णा आंधळे संबंधी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. नाशिक येथे सहदेवनगरमधील आनंद हाईट्सजवळ एका मंदिराजवळ कृ्ष्णा आंधळे दिसल्याचा दावा वकील गितेश तानाजीराव बनकर यांनी केला आहे.
काय म्हणाले बनकर?
‘सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मी दत्त मंदिराजवळ आलो. तिथे एका झाडाजवळ मला दोघे दिसले. त्यातील एकाने मास्क खाली केल्यावर मला चेहरा दिसला. १०० टक्के सांगतो तो कृष्णा आंधळेच होता, दुसऱ्या मिनिटाला मी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये फोन करत माहिती दिली. दोघे त्यानंतर मखमलाबादच्या दिशेने गेले. मी एक वकील असून गेल्या १८ वर्षांपासून क्रिमिनल कोर्टात नाशिक आणि मुंबईला प्रॅक्टिस करत असल्याने गुन्हेगाराला कसे ओळखायचे हे मला चांगलं माहित असल्याचं वकील गितेश बनकर यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी देखील नाशिकमध्ये मागील महिन्यात एका मंदिरात कृष्णा आंधळे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र ती अफवा असल्याचं निदर्शनास आलं होतं. आता बनकर यांनी आंधळे दिसल्याचा दावा केल्याने पोलिसांना कसून तपास करावा लागणार आहे. गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस आता त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असून पळून गेलेला नेमका कोण होता? याचा शोध घेत आहेत.
Leave a Reply