कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर मुंबई, नाशिक आणि जळगाव येथे गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे रद्द करावे या मागणीसाठी कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असुज त्यावर तातडीने आज सुनावणी झाली. आता याची पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार आहे. तर मद्रास उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जमिनीचा कालावधी 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे.
कुणाल कामरा याने या संदर्भात शिवसेनेने दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या विषीयी कामरा याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, माझ्या अशिलाने मुंबई पोलिसांमोर हजर राहण्यासाठी असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निवेदन देण्याची तीनदा विनंती केली आहे. मात्र, तरी देखील पोलिस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थितीचा आग्रह धरत आहेत. त्यासाठी तीन वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहकार्य करण्याची विनंती केली होती. मात्र, हा काही खून खटला नाही, हा एक विनोदी कार्यक्रम आहे मात्र, मुंबई पोलिस खून खटला असल्याप्रमाणे या प्रकरणात वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विडंबन गीत सादर करणाऱ्या कामरा विरोधात खार (मुंबई), जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व एफआयआर आता खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीला हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले आहेत. परंतु तिन्ही वेळा तो चौकशीला गैरहजर राहिला. सोमवारी त्याचे वकील द्वय नवरोज सिरवई आणि अश्विन थूल यांनी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम.मोडक यांच्या खंडपीठाला याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली. यावर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर आमदार मुरजी पटेल यांनी आक्षेप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती,
कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामरा यांना 7 एप्रिलपर्यत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यत अंतरिम संरक्षण देण्यात आले.
Leave a Reply