मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवत संकटात सापडलेल्या गर्भवती महिलेला मदत करत तिचा आणि नवजात बाळाचा जीव वाचवला. निर्भया पथकाच्या महिलांनी तातडीने कारवाई करत वेळीच मदत केली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी १२:५४ वाजता साउथ कंट्रोल रूमला माहिती मिळाली की रे रोड, शिवडी येथे एका गर्भवती महिलेला तातडीने मदतीची गरज आहे. माहिती मिळताच निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तिथे मासूमा शेख नावाची महिला एका बंद टॅक्सीत रक्ताने माखलेली आणि प्रसूती वेदनांनी तडफडत असल्याचे आढळले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्भया पथकाने तातडीने 108 क्रमांकावर कॉल करत रुग्णवाहिका बोलावली.
काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. डॉ. सुलतान आणि निर्भया पथकाच्या मदतीने महिलेला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू झाल्यानंतरही महिलेचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले नाहीत. अशा परिस्थितीत निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत, रुग्णालयातील औपचारिकता पूर्ण केली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत उपचारांची व्यवस्था केली.
मासूमा शेख यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. महिलेचा पती शहराबाहेर असल्याने ती सध्या आपल्या आजी मजूदा शेख यांच्यासोबत राहत होती.
मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलिसांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे एका आईचा आणि तिच्या बाळाचा जीव वाच ला.
Leave a Reply