अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील जंगलातील आग अजूनही धगधगत आहे. या आगीत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण बेपत्ता असल्याची माहिती ‘द असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या आगीत १२,००० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक दिवसांपासून लागलेली ही आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत वारे तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे ही आग आणखी भडकेल. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत २४ जणांचा बळी गेला आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या १६ जण बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय हवामान विभागाने या भागासाठी तीव्र आगीच्या परिस्थितीचा इशारा दिला आहे. मंगळवारी ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, तर पर्वतीय भागात हा वेग ११३ किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता आहे, असे हवामानतज्ज्ञ रिच थॉम्पसन यांनी सांगितले.
लॉस एंजेलिस सिटी मेडिकल एक्झामिनर कार्यालयाने सांगितले की, १६ जणांचे मृतदेह सापडले असून त्यापैकी पाच जण पॅलिसेड्समध्ये तर ११ जण ईटन परिसरात मृत अवस्थेत आढळले. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी नोंदवण्यासाठी एक विशेष केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने आग नियंत्रणासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. सध्या पॉल गेटी संग्रहालय आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाजवळील आगीला थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मँडेव्हिल कॅन्यन परिसरातही आगीचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा परिसर प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगरसह अनेक सेलिब्रिटींच्या घरांसाठी ओळखला जातो.

लॉस एंजेलिसच्या जंगलाला लागलेल्या आगीने घेतले भयंकर रूप; 24 जणांचा मृत्यू, हजारो घरे उद्ध्वस्त
•
Please follow and like us:
Leave a Reply