प्रयागराज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ २०२५ च्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी या भव्य सोहळ्यासाठी झालेल्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करत “राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य पाठिंब्याने कोणताही उद्देश साध्य करता येतो” असे विधान केले.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी X वरील पोस्टद्वारे महाकुंभ २०२५ च्या ऐतिहासिक यशाचा उल्लेख केला. ते म्हणाले,
“आदरणीय पंतप्रधान, तुमच्या दूरदर्शी मार्गदर्शनामुळेच प्रयागराज येथे ‘एकता, समता आणि सौहार्दाचा महायज्ञ’ असलेला महाकुंभ २०२५ आज स्वच्छता, सुरक्षा आणि सुशासनाचे नवे मापदंड प्रस्थापित करत यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.”
महाकुंभाच्या व्यापकतेवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या ४५ दिवसांत, कोट्यवधी श्रद्धाळू भक्तांनी, तसेच संत- महंतांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करून आध्यात्मिक लाभ घेतला आहे. हा सोहळा संपूर्ण जगाला ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देत आहे.” मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सततच्या पाठिंब्याचे विशेष कौतुक केले आणि म्हणाले,तुमच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आम्हा सर्वांना नवीन ऊर्जा मिळते. या ऐतिहासिक कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.”
पंतप्रधान मोदींचे आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक
याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले,
“उत्तर प्रदेशचा खासदार म्हणून मला अभिमान वाटतो की आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार, प्रशासन आणि लोकांनी एकत्रितपणे हा ‘एकतेचा महाकुंभ’ यशस्वीरीत्या संपन्न केला आहे.”
महाकुंभ २०२५ च्या यशस्वी समारोपानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगेला अभिवादन केले. या समारंभाला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, मंत्री स्वतंत्रदेव सिंह आणि नंद गोपाल गुप्ता उपस्थित होते. महाकुंभाच्या व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावलेल्या स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्यांना सन्मानित करत,”पंतप्रधान मोदी यांच्या इच्छेनुसार, या भव्य आणि दिव्य कुंभमेळ्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्व अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, वाहतूक विभाग आणि जलपुरवठा विभागाने दिलेल्या योगदानासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो,” असे गौरवोद्गार काढले.महाकुंभाच्या आयोजनामध्ये सामूहिक प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा कोणतेही कार्य सहकार्य आणि समर्पणाने केले जाते, तेव्हा त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात. प्रयागराज महाकुंभ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रयागराजच्या नागरिकांचेही आभार मानले.
गेल्या दोन महिन्यांत, प्रयागराजच्या लोकांनी कोणतीही तक्रार न करता, हा संपूर्ण उत्सव स्वतःचा मानला आणि प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले. त्यांच्या सहकार्याशिवाय हा सोहळा यशस्वी होऊ शकला नसता,” असे ते म्हणाले.१३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू झालेला महाकुंभ २६ फेब्रुवारीला यशस्वीरित्या संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याने धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत जागतिक स्तरावर मान्यता मिळवली आहे.
Leave a Reply