२६/११ हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई : तहव्वुर राणा भारतात दाखल; एनआयएकडून कडेकोट बंदोबस्त

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पित करून गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये दाखल करण्यात आले. जवळपास १६ वर्षांनंतर भारतात परत आणलेल्या राणाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणि दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. एनआयएच्या विशेष पथकाने बुधवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष संरक्षण पथकाला गुरुवारी सकाळी सात वाजता विमानतळावर जेल व्हॅन पाठवण्याचे आदेश दिले होते. या व्हॅनसोबत पोलिसांचा पायलट एस्कॉर्टही होता.

 

दिल्ली विमानतळ परिसरात आधीच स्वॅट कमांडोची नेमणूक करण्यात आली होती. तसेच, एनआयए मुख्यालयाजवळील प्रगती विहार भागातही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएचे तीन वरिष्ठ अधिकारी आणि तीन गुप्तचर अधिकारी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत पोहोचले होते. त्यांनी तेथून राणाला न्यायालयीन परवानगी घेऊन ताब्यात घेतले आणि भारतात आणले.

 

राणाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार असून, त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार असल्याचे समजते. त्याला दिल्लीतील तिहार कारागृहातील उच्च सुरक्षा विभागात ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या कोठडीत २४ तास सीसीटीव्ही निगराणी आणि आवश्यक सुविधा, जसे की बाथरूम, पुरवण्यात येणार आहेत. बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत प्रत्यार्पण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि एनआयएचे संचालक सदानंद दातेही उपस्थित होते.

 

अमित शहा यांनी रात्री ‘न्यूज १८ रायझिंग भारत समिट’मध्ये बोलताना, राणाचे प्रत्यार्पण हे मोदी सरकारचे मोठे राजनैतिक यश असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “२६/११ च्या हल्ल्यानंतर भारताच्या सन्मानावर झालेल्या आघाताचा प्रतिशोध घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.” काँग्रेसवर अप्रत्यक्ष टोला लगावत शहा म्हणाले, “जे लोक २००८ मध्ये सत्तेत होते, त्यांना राणाला भारतात आणता आले नाही.”

 

दरम्यान, गृह मंत्रालयाने उशिरा जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, ज्येष्ठ विधिज्ञ नरेंद्र मान यांची एनआयएच्या विशेष न्यायालयात तीन वर्षांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नेमणूक राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम, २००८ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अन्वये करण्यात आली आहे. याआधी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाने केलेली प्रत्यार्पण स्थगितीची मागणी फेटाळली होती. ‘सरेंडर वॉरंट’ची अधिकृत पुष्टी झाल्यानंतरच भारतीय पथक अमेरिकेला रवाना झाले होते. तहव्वुर राणा हा ६४ वर्षीय पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक असून, २६/११ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याचा निकटवर्तीय आहे. त्याला लॉस एंजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमधून भारतात आणण्यात आले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *