सोलापूर उसाच्या रसापासून गूळनिर्मिती ही पारंपरिक पद्धत असताना, सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथे पहिल्यांदाच नीरेपासून गूळ तयार करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमाला बाजारपेठेत मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. माळीनगरचे पृथ्वीराज निळकंठ भोंगळे या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी केला आहे. केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये नीरेपासून गूळनिर्मिती केली जात असली तरी, महाराष्ट्रात हा प्रयोग पहिल्यांदाच यशस्वीपणे राबवला गेला आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी भोंगळे यांच्या या नव्या प्रयोगाचे कौतुक केले आहे. निळकंठ भोंगळे यांच्या मालकीच्या सहा एकर क्षेत्रावर शिंदीची लागवड करण्यात आली आहे. खजूर कुटुंबातील या झाडांपासून आरोग्यदायी नीरा मिळते. ‘कल्पतरू नीरा पाम’ या ब्रँडच्या माध्यमातून भोंगळे कुटुंबीय हा व्यवसाय करतात.
पृथ्वीराज भोंगळे यांनी नीरेपासून काकवी आणि गूळ तयार करण्यासाठी सखोल अभ्यास केला. पश्चिम बंगालमधील कुशल कामगारांच्या मदतीने त्यांनी गूळनिर्मिती प्रक्रिया सुरू केली. नीरा झाडावरून उतरवल्यानंतर ती शुद्ध केली जाते आणि भट्टीवर उकळवून अष्टकोनी कढईत तापविली जाते. गूळ तयार झाल्यानंतर त्याला चौकोनी आकारात घालून ५० ग्रॅम वजनाच्या वड्या तयार केल्या जातात.
या गुळाला मुंबई, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही या गुळाची विक्री केली जाते, असे पृथ्वीराज भोंगळे यांनी सांगितले.
शिंदीच्या झाडांची देखभाल, मजुरी, गूळनिर्मिती, पॅकिंग आणि ब्रँडिंग यावर खर्च झाला तरी नीरेपासून मिळणारे उत्पन्न किफायतशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योगायोगाची बाब म्हणजे १९३२ मध्ये महाराष्ट्रातील पहिला खासगी साखर कारखाना याच माळीनगरमध्ये सुरू झाला होता. दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्याने माळी समाजातील शेतकऱ्यांना उद्योगात नवा मार्ग दाखवला होता.
आता त्याच माळीनगरातून पृथ्वीराज भोंगळे यांनी नीरेपासून गूळनिर्मितीचा नवा अध्याय सुरू केला आहे, जो राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

माळीनगरमध्ये नीरेपासून गूळनिर्मितीचा पहिलाच यशस्वी प्रयोग!
•
Please follow and like us:
Leave a Reply