राजकारणा पलीकडील स्नेह – आदराचे दर्शन
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी राजकारण विरहीत व्यक्तिगत स्नेहाचा एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा हात पकडत दीपप्रज्वलन केले. दोघेही स्टेजवर अगदी शेजारी बसले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी पवारांसमोरील पाण्याचा ग्लास स्वतः भरला आणि त्यांचं भाषण संपल्यानंतर सन्मानपूर्वक उभे राहत, त्यांना बसण्यासाठी खुर्चीही सरकावली.
यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत, केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याबद्दल संपूर्ण मराठी जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो,” असे पवार म्हणाले. पवार पुढे म्हणाले, “मी स्वतः पंतप्रधानांकडे जाऊन या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनी अवघ्या एका मिनिटातच होकार दिला.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचं आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फक्त एक राज्यापुरतं किंवा भाषेपुरतं मर्यादित नाही. इथे स्वातंत्र्यलढ्याचा सुगंध आहे, महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आहे. ग्यानबा-तुकारामांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे.”
Leave a Reply