मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मोठा खुलासा; आरोपपत्र दाखल, घटनेचा A टू Z उलगडा होणार?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोप, राजकीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आणि सत्ताधारी पक्षाकडून आरोपींना वाचवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न यामुळे मागील अडीच महिन्यांपासून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे.
या घटनेतील आरोपींविरोधात आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात तब्बल १४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल होणार आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह आठ आरोपी अटकेत असून, कृष्णा आंधळे फरार आहे. मागील दोन-अडीच महिन्यांत पोलीस, एसआयटी आणि सीआयडीने या हत्येच्या तपासात काय निष्कर्ष काढले, याचा उलगडा या आरोपपत्रातून होणार आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील खंडणी प्रकरण हे या हत्येमागचे कारण असल्याचा आरोप आहे. खंडणीपासून अपहरण आणि हत्येपर्यंतच्या घटनाक्रमाचा तपास सीआयडी व एसआयटीने केला असून, आज दाखल होणाऱ्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
या १४०० पानी आरोपपत्रात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत महत्त्वाचे पुरावे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ॲड. बाळासाहेब कोल्हे हे सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नेमले गेले आहेत. हे प्रकरण राज्याच्या राजकारणासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी निर्णायक ठरणार असून, या आरोपपत्रामुळे अनेक नव्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *