धारावीतील सायन-धारावी लिंक रोडवर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. आगीच्या तीव्रतेमुळे सिलिंडरचा एकामागोमाग एक स्फोट होत राहिला, ज्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई अग्निशमन दलाने या आगीला ‘लेव्हल-२’ ची श्रेणी दिली असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. ट्रकला आग लागल्यानंतर सिलिंडरचे स्फोट होऊ लागल्याने ज्वाळा आकाशात झेपावल्या आणि दूरपर्यंत धुराचे लोट दिसू लागले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक तपासानुसार, या दुर्घटनेत चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
धारावी पोलिसांच्या माहितीनुसार, संध्याकाळी सुमारे ९.४५ ते १० वाजताच्या सुमारास निसर्ग उद्यानाजवळ ही घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून, सलग स्फोटांच्या भीषण दृश्यांनी नागरिकांना हादरवून सोडले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, अधिकृत तपास सुरू आहे.
Leave a Reply